शेतकर्‍यांना करोडपती करणारी सुगंधी शेती: जाणून घ्या पिकाविषयी संपूर्ण माहिती

Geranium Plant Farming: जगात अश्या अनेक वनस्पती आहेत ज्यांच्या उत्पादनांना बाजारपेठेत मोठा दर मिळतो. जिरेनियम ही वनस्पती यापैकीच एक असून सुगंध उत्पादनांमध्ये या वनस्पतीच्या तेलाला सर्वाधिक मागणी आहे.

आपण वापरत असलेल्या दैनंदिन सौंदर्य प्रसादानांमध्ये जिरेनियम वनस्पतीचे तेल सर्वाधिक वापरले जाते. भारतीय बाजारपेठेत देखील या तेलाला मोठी मागणी असून सध्या जिरेनियम तेलाची गरज भागवण्यासाठी परदेशातून आयात करावी लागते. त्यामुळे भारतीय शेतकर्‍यांना या पिकाच्या लागवडीतून आणि तेल निर्मिती व्यवसायातून आर्थिक कमाईची मोठी संधि आहे.

चला तर मग जाणून घेऊया जिरेनियम पिकाची लागवड कशी करतात, त्यासाठी जमीन कशा प्रकारची लागते आणि या पिकासाठी वातावरण कसे असावे यासंबंधित संपूर्ण माहिती.

जिरेनियम वनस्पतीची शेती

जिरेनियम ही एक सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे. जिरेनियम ची लागवड मध्यम प्रतिच्या जमिनीवर आणि माळरानावरही करता येते.

सर्वसाधारण 20 अंश सेल्सिअस ते 34 अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते. त्यापेक्षा कमी-जास्त तापमान असल्यास पिकांची वाढ खुंटते. त्यामुळे पाहिजे तसे उत्पन्न शेकर्‍यांना मिळत नाही.

शेवगा पानांच्या पावडर पासून लाखोंची कमाई: परदेशात मोठी मागणी, किलोला मिळतोय हजारो रुपये दर

जिरेनियम पिकासाठी आद्रता 75 ते 80 टक्के आवश्यक असते. या पिकाची पावसाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते. अति पावसाच्या प्रदेशात याच्या फांद्या कुंजण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळयाआधीच कापणी करून घेतल्यास फारसे नुकसान होत नाही.

बाकीच्या ऋतूंमध्ये जिरेनियम पिकावर फारसा परिणाम होत नाही. एकदा लागवड केल्यानंतर जिरेनियम पिकाची 3 वर्ष किंवा त्याहून अधिक वर्ष पिके घेता येतात. त्यामुळे जिरेनियम पिकासाठी शेतीची योग्य प्रकारे नांगरणी आणि मशागत करणे गरजेचे आहे.

मशागत केल्यानंतर बेड व्यवस्थित तयार करून घ्यावेत, त्यावर ठिबक अंथरूण चार बाय दीड फूट अंतरावर रोपांची लागवड करावी. एक एकर जमिनीमध्ये साधारण 10,000 रोपे लावली जावू शकतात.

लागवडीनंतर पहिल्यांदा हे पीक चार महिन्यांनंतर कपणीसाठी तयार होते. त्यानंतर प्रत्येक तीन महिन्याला कापणी करता येते. जिरेनियम लागवड केल्यानंतर वर्षाला एकरी 30 ते 40 किलो तेल मिळते.

कापणी केल्यानंतर जिरेनियमच्या पालापासुन ऊर्ध्वपातन पद्धतीने तेल काढले जाते. सध्या 1 लिटर तेलाला बाजारात 12 ते साडे बारा हजार रुपये इतका दर मिळत आहे. त्यामुळे एका वर्षाला एका एकरातून किमान 4 ते 5 लाखांचे उत्पन्न सहज मिळते.

जिरेनियम तेलाला भारतात मोठी मागणी

जिरेनियम पासून तयार झालेले तेल सौंदर्य प्रसादानांची निर्मिती करणार्‍या कंपन्यांना थेट विकता येते.

बर्‍याचदा, अनेक शेतकरी पुरेश्या माहीत अभावीच एखादे पीक घेण्याचा प्रयत्न करतात आणि तोट्यात जातात. त्याऐवजी शेतकर्‍यांनी कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी ती योग्यरीत्या कशी करावी, वातावरण योग्य आहे का, त्यासाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न फायद्याचे आहे का तसेच तयार होणार्‍या मालाला बाजारपेठ उपलब्ध आहे का याचा पुरेपूर अभ्यास करूनच त्या पिकाची लागवड करावी.

सध्या जिरेनियम तेलाला भारतात मोठी मागणी आहे. दरवर्षी किमान 200 ते 300 टन तेल भारतीय बाजारपेठेत गरजेचे आहे. परंतु आज घडीला भारतात दरवर्षी 10 ते 20 टन इतकीच तेल निर्मिती होते. त्यामुळे जिरेनियमची लागवड भारतीय शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरणारी आहे.

हे देखील वाचा:

Leave a Comment